
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत तुर्तास अरिहंत फायबर्स, गंगाखेड रोड, परभणी या कापूस खरेदी केन्द्रांवर भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय.) मार्फत शासकीय हमीदराने कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी किसान अॅपद्वारे नोंदणी करुन स्लाट बुकिंग केलेल्या 5 कापुस उत्पादक शेतकरी बांधवाच्या कापसास, शासनाने जाहीर केलेल्या हमी भावानुसार खरेदी केंद्रावर विक्रीस आलेल्या वाहनातील कापसाच्या आर्द्रतेनुसार कमाल रु. 8060 व किमान रु. 7712 इतका बाजार भाव प्राप्त झालेला आहे.
या कापूस विक्रीचा शुभारंभ खासदार संजय जाधव यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती रामशेर वरपुडकर यांची उपस्थिती होती. सी.सी. आय. कापूस खरेदीच्या कापुस शुभारंभा प्रसंगी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजयराव चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती मुंजाजीराव जवंजाळ, संचालक सर्वश्री गणेशराव घाटगे, संग्राम जामकर, गंगाप्रसाद आनेराव, पांडुरंग खिल्लारे, विनोदराव लोहगांवकर, घनशामराव कनके, रमेशराव देशमुख, सोपानराव मोरे, रावसाहेब रेंगे, सी.सी.आय.चे केन्द्र प्रमुख कोल्हे, अरिहंत जिनींगचे मालक अजय सरिया, दिपस्तंभ जिनींचे मालक दिलीप मुरकुटे, संतप्रयाग जिनींगचे मालक सुभाष अंबिलवादे, बाजार समितीचे सचिव व अधिकारी वर्ग, कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव, हमाल मुकादम उपस्थित होते. कापुस शुभारंभ प्रसंगी खरेदी केंद्रावर वाहन घेऊन आलेले कापुस उत्पादक शेतकरी सर्वश्री. भास्कर बापुराव नाईकवाडे, श्रीकांत दत्तात्रय कुटे, सतीश किशनराव कुटे, दिलीप तुकाराम गोरे, शुभम देवडे यांचा फेटा व हार घालून तसेच श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कापूस खरेदी मर्यादा एकरी 12 क्विंटलपर्यंत वाढवावी...
या प्रसंगी खासदार संजय जाधव यांनी सांगितले की, शासनाने सन 2024-25 च्या कापूस हंगामात एकरी 12 क्विंटलपर्यंत कापूस खरेदी केला होता. मात्र चालू 2025-26 हंगामात ही मर्यादा कमी करून केवळ 5.33 क्विंटल इतकी ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आले असताना, ही मर्यादा अन्यायकारक ठरत आहे. एकरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन घेणार्या शेतकर्यांना उर्वरित कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, चालू हंगामातील ही मर्यादा रद्द करून मागील हंगामाप्रमाणेच एकरी 12 क्विंटल कापूस खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे करण्यात यावी. तसेच, सी.सी.आय. कापूस खरेदीवेळी प्रत्यक्ष शेतकर्याची उपस्थिती बंधनकारक केल्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अनेक शेतकर्यांच्या 7/12 उतार्यावर वृद्ध, महिला, अपंग किंवा अज्ञान पालकांची नावे असल्याने त्यांना खरेदी केंद्रावर आणणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत त्यांच्या रक्तसंबंधातील नातलग शेतकरी केंद्रावर उपस्थित राहिल्यास त्यांच्या कापसाची खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी सी.सी.आय. केंद्र प्रमुखांकडे करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis