
अमरावती, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) रेवसा येथील २००७ च्या पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना अद्याप घरांचे पैसे, जागा व मूलभूत नागरी सुविधांचा लाभ न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांकडून उद्या, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनही करण्यात येणार आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांमध्ये २००७ च्या व्हॅल्युएशनऐवजी आजच्या बाजारभावानुसार घरांचे पैसे देणे, बेघर व गरजूंना घरे व जागा उपलब्ध करून देणे, सर्व पुनर्वसितांना नागरी सुविधांचा लाभ देणे, तसेच मंदिर, मस्जिद व बुद्ध विहारासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करणे, पुनर्वसित क्षेत्राचा ‘८ अ’ नोंद करून सातबारा तयार करणे, तसेच यादीतून वगळलेल्या पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा समाविष्ट करणे या प्रमुख आहेत.
न्याय व हक्कांसाठी पूरग्रस्त नागरिकांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी