
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)कोकणातील शेतीला पावसाचा आशीर्वाद लाभतो, पण यंदा हा पाऊस आशीर्वादापेक्षा शाप ठरल्याचं चित्र दिसतंय. अतिवृष्टी, हवामानातील अनियमिता आणि शासकीय अडथळे यामुळे कोकणातील भात शेती गंभीर संकटात सापडली आहे. वाढते शहरीकरण, मजुरांची टंचाई आणि हवामानातील बदल या सगळ्या आव्हानांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला आहे.
मे महिन्यापासून सुरू झालेल्या अनियमित पावसामुळे भात लागवडीवर परिणाम झाला. परतीच्या पावसाने त्यात कडी केली. रायगडसह ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून तब्बल ३० ते ३५ हजार हेक्टरवरील भात पीक नष्ट झालं. उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. शासनाकडून मदतीची घोषणा झाली असली, तरी ऍग्रीस्टॅक नोंदणीची सक्ती शेतकऱ्यांसाठी मोठा अडसर ठरली आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अजून तयार झालेले नाहीत, त्यामुळे अनेकांना अनुदान थांबले आहे.
राज्य शासनाने केंद्र सरकारच्या २,३६९ रुपये प्रति क्विंटल हमीभावाची घोषणा केली असली, तरी जास्त आर्द्रतेचा भात खरेदीस नाकारला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढले आहे. पिक विमा योजनेचे कठोर निकष आणि प्रशासनातील दिरंगाईमुळेही कोकणातील शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळत नाही. अनेक ठिकाणी भात खरेदी केंद्रांना अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. “आम्ही निसर्गाच्या प्रकोपातही उभे राहतो, पण शासनाच्या निकषांनी आम्ही कोलमडलो आहोत,” असं शेतकऱ्यांचं मत आहे. ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके