
— तरुण कवींनी कवितांनी रंगवली मैफल
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, तसेच कलारंग सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले ते कवीमित्र रितेश घासे स्मृती काव्य कट्ट्याचे आयोजन.
या काव्य कट्ट्यात तरुण कवींनी सादर केलेल्या भावस्पर्शी कवितांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. प्रारंभी कलारंगचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी कवी रितेश घासे यांच्या स्मृतींना अभिवादन करत सर्व उपस्थितांसह श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव धनावडे यांनी करताना जेष्ठ साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे यांना नवोदित कवींना मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
विक्रांत वार्डे यांनी आपल्या गेय कवितेने काव्य कट्ट्याची रंगत वाढवली. जीविता पाटील यांनी पालकांच्या प्रेमाचे भावपूर्ण चित्र उभे केले, तर रुपेश पाटील यांनी ‘तफावतीची दिवाळी’ या कवितेद्वारे सामाजिक वास्तव अधोरेखित केले. सुचिता साळवी, गायत्री तुळपुळे, रंजिता गोवेकर, निरंकार पाटील, दीप्ती जोशी, विजय म्हात्रे, प्रणित थळे आणि आनंद पाटील यांसारख्या कवी कवयित्रींनी आपापल्या प्रभावी रचना सादर केल्या.
संमेलन स्वागताध्यक्ष रमेश धनावडे आणि महेश कवळे यांच्या हस्ते सहभागी कवींना सन्मानित करण्यात आले. नातेसंबंध, निसर्ग, समाजकारण, अध्यात्म अशा विविध विषयांवरील कवितांनी श्रोत्यांना विचार करायला लावले. रायगड जिल्ह्यातील अनेक नवोदित कवींनी सहभाग घेऊन आपल्या सर्जनशीलतेने उपस्थितांची दाद मिळवली. अलिबागचा हा काव्य कट्टा रितेश घासे यांच्या स्मृतींना अभिवादन करत नव्या पिढीच्या कवितांना व्यासपीठ देणारा ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके