
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक
बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर केले असून बारावीच्या लेखी परीक्षा १० तर दहावीच्या २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या वर्षी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर केंद्रांवर राहणार आहे. यासाठी केंद्रांची पडताळणी करूनच मंजुरी मिळणार आहे. गतवेळी दहावीसाठी १५६ तर बारावीसाठी १०३ परीक्षा केंद्रे होती.
आगामी परीक्षा कॉपीमुक्त आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, परीक्षेच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य पातळीवरून बैठका घेत नियोजन सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक
करण्यात आले आहेत. सर्वच परीक्षा केंद्रांवर सर्व भौतिक सुविधांसह सुरक्षित भिंती, जाळीदार खिडक्या आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच काही नवीन केंद्रांनाही मान्यता दिली जाणार आहे. सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य असून याची पडताळणीही वेळोवेळी होणार आहे. शिवाय बैठे पथक, पथक, भरारी पथकांबरोबर महसूलच्या पथकांचाही यामध्ये समावेश राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेसाठी तयार करण्याचा सल्ला शाळांना दिला आहे. सीसीटीव्ही, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा पडताळणीदरम्यान आढळून आली नाही तर केंद्र रद्द केले जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास केंद्राची मान्यताही कायमस्वरूपी रद्द केली जाईल.
यंदा बारावीसाठी 903 परीक्षा केंद्रे राहणार आहेत. इयत्ता बारावीसाठी गतवर्षी एकूण १०६ परीक्षा केंद्रे होती. यंदाही एवढीच केंद्रे राहणार असून सुविधांची कठोर तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून डिजिटल साधनांच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही, ड्रोनचा समावेश आहे. गैरप्रकारांवर कठोर कार्यवाही केली जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis