


रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून अलिबाग नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि भाजप-शिंदे युती यांच्यात थेट आरपारची लढाई पेटली आहे. या निवडणुकीत शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक रणांगणात उतरल्या असून त्यांच्या पाठीशी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उभे आहेत. दुसरीकडे, शेकापचा पाया उपटण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने पूर्ण ताकदीनं मोर्चा उघडला आहे.
अलिबाग ही शेकापची शेवटची मजबूत गढी मानली जाते. विधान परिषदेतील पराभवानंतर सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. राज्यात शेकापचं अस्तित्व कमी झाल्यानंतर अलिबाग ही त्यांची शेवटची पोस्ट म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे.
भाजप आणि शिंदे गटाने ‘ऑपरेशन शेकाप फिनिश’ ही रणनिती आखली असून आमदार महेंद्र दळवी यांनी उघडपणेच शेकापचा कारभार संपवण्याची घोषणा केली आहे. शेकापमधील अंतर्गत गटबाजी, चित्रलेखा पाटील यांचा वाढता हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांची पडलेली नाराजी यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. त्यातच काही जुने कार्यकर्ते भाजपकडे वळल्याने युतीचा आत्मविश्वास वाढला आहे.
या लढतीत एक वेगळा ट्विस्ट म्हणजे आमदार दळवी हे प्रशांत नाईक यांचे व्याही आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीयच नव्हे तर कौटुंबिक सुद्धा ठरणार आहे. अलिबाग नगरपालिका निवडणूक ही शेकापसाठी अस्तित्वाची आणि युतीसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली असून निकालावरून रायगडच्या राजकारणाची नवी दिशा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके