
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १२७ शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीतील नुकसानीपोटी १५१९ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. परंतु, डीबीटी, फार्मर आयडी, ई-केवायसी अशा बाबींमुळे आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपयांचीच भरपाई मिळाली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही?, त्याचे मूळ कारण काय?, हे आता स्वत:च्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाने त्या याद्या तलाठ्यांच्या मोबाईलवर पाठविल्या आहेत.अतिवृष्टी व सीना नदीचा पूर, सततचा पाऊस यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला. राज्य सरकारने तातडीने पंचनामे अहवाल मागवून मदतीची रक्कमदेखील वितरित केली. तरीपण, अजूनही जिल्ह्यातील चार लाख २६ हजार ७८ शेतकऱ्यांची १११० कोटींची भरपाई प्रलंबित आहे. गावातील शेजारील शेतकऱ्याला किंवा घरातील एका सदस्यास मदतीची रक्कम आली की दुसरा शेतकरी तलाठ्यांना थेट फोन लावत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड