
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। ई-केवायसी नसणे, नावात बदल किंवा त्रुटी, बॅंक खात्याचा तपशील चुकीचा असल्याने चार लाख १५ हजार शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी व महापुराची भरपाई मिळालेली नाही. त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील वेगवेगळ्या भागात विशेष कॅम्प राबविले जाणार आहेत.अतिवृष्टी व सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी केंद्र व राज्य सरकारने ८६७ कोटी ३७ लाख रुपयांची मदत दिली. तर रब्बीच्या मशागत व बियाणांसाठी ६५२ कोटी रुपये दिले. परंतु, अजूनही ६० टक्के शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत. पूर्वी आधारलिंक खात्यात मदत जमा होत होती. परंतु, आता मदतीसाठी फार्मर आयडीचे बंधन घातले. अनेकांनी नव्याने फार्मर आयडी काढले तर काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती. त्यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड