
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।जिंतूर नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उबाटा गट) सुरेखा शेवाळे-टाळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केला.
गेल्या काही वर्षांपासून सुरेखा शेवाळे-टाळे या शिवसेना (उबाटा गट) सोबत कार्यरत आहेत. विशेषतः त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर सौ. शेवाळे यांचा चांगला संपर्क राहिला आहे. विशेषतः महिलांमध्येही त्या चांगल्या लोकप्रियता आहेत. त्यामुळे सौ. शेवाळे यांना नगराध्यक्षपदाकरीता उमेदवारी बहाल केली जाईल, अपेक्षा होती. मात्र, पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबत विलंब होत असल्याने सौ. शेवाळे यांनी स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
समर्थक आणि महिला व युवा पिढी यांची साथ या तिहेरी सुत्रामुळे अपक्ष म्हणून फॉर्म भरून जनसेवा जनतेची सेवा करता येईल, असे मत सुरेखा शेवाळे यांनी व्यक्त केले. आपण पक्षासाठी मनापासून काम केले आहे. मात्र उमेदवारीबाबत अन्याय झाल्याने आपण जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे, आपली उमेदवारी ही जनतेच्या विश्वासाची आहे, पक्षाच्या तिकिटाची नव्हे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या घटनाक्रमामुळे शिवसेनेच्या (उबाठा ) स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, नगराध्यक्ष पदासाठीच्या स्पर्धेत आता नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis