
* पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील जमीन विकताना गैरप्रकार
* मालक मयत, वारस नोंद नसतानाही व्यवहार
* जुना सातबारा जोडून झाली खरेदी विक्री
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विदया शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकाना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुण्याजवळील मौजे ताथवडे, ता. मुळशी येथील सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ च्या नोंदणीत ही अनियमितता झाली आहे. या जमिनीवर पशुसंवर्धन आयुक्तांचा ताबा असून, शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी असलेली मालमत्ता आहे. दस्तनोंदणीच्या वेळी, बडे यांनी अद्ययावत किंवा नजिकच्या कालावधीतील सातबारा उतारा जोडण्याची बाब दुर्लक्षित केली. त्यांनी जुना सातबारा स्वीकारला. जर त्यांनी दस्त नोंदणीच्या तारखेस लागू असलेला सातबारा तपासला असता, तर त्यावर 'शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी' हा प्रतिबंधात्मक शेरा दिसला असता आणि दस्त नोंदणी नाकारता आली असती.
उताऱ्यावरील मालक मयत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही, तांत्रिक अडचणीचे कारण देत 'स्किप' पर्याय वापरून दस्त नोंदणी पूर्ण करण्यात आली. साठी त्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नाही, याशिवाय काही अनियमितता करून व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी