
नाशिक, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.
सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाला मान्यवरांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV