गेवराईत बँकेतून काढलेले दीड लाख चोरट्यांनी हिसकावले, गुन्हा दाखल
बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। बँकेतून काढलेली दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन बाहेर पडताच दुचाकीस्वारांनी पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना गेवराई शहरात घडली. शहरातील मुख्य रस्त्यावर घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आह
गेवराईत बँकेतून काढलेले दीड लाख चोरट्यांनी हिसकावले, गुन्हा दाखल


बीड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

बँकेतून काढलेली दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन बाहेर पडताच दुचाकीस्वारांनी पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना गेवराई शहरात घडली. शहरातील मुख्य रस्त्यावर घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेवराई तालुक्यातील सेलू येथील रहिवासी दादासाहेब प्रभाकर यादव हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून १ लाख ५० हजार रुपये काढून घेऊन जात होते. बँकेतून बाहेर आल्यानंतर शहरातून जात असताना त्यांच्या मागच्या बाजूने सुसाट वेगात दुचाकी आली होती. या वेळी दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्यानेदादासाहेब यादव यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली आणि दोघांनी बीडच्या दिशेने पळ काढला. भरदिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही क्षणातच गोंधळ उडाला.

या घटनेनंतर दादासाहेब यादव यांनी गेवराई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस ठाणे हद्दीत नाकेबंदी केली. बीडकडे पळून गेलेल्या चोरट्यांचा आणि त्यांच्या स्पोर्ट्स बाइकचा शोध पोलिस घेत आहेत.

या धाडसी चोरीमुळे गेवराई शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande