कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचा ‘प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक’ पुरस्काराने गौरव
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुर
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांना ‘प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक’ पुरस्काराने गौरव


परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा सन्मान भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान (सीआयएई) यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘कृषीसाठी अभियांत्रिकी नवाचार 5.0’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. मणि यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी सीआयएईचे संचालक डॉ. सी.आर. मेहता, आय.एस.ए.ई. संघाचे अध्यक्ष डॉ. एस.एन. झा, तसेच परिषदेचे संयोजक डॉ. के.एन. अग्रवाल उपस्थित होते. या परिषदेत देश-विदेशातील सुमारे ६०० वैज्ञानिक, शैक्षणिक संस्था, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणनिर्माते सहभागी झाले होते.

कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी कृषि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष व उद्योजकतेची भावना जागृत करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार या तिन्ही क्षेत्रांत अनेक नवे उपक्रम राबवले आहेत.

त्यांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून ‘A ग्रेड’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले असून, ३.२१ गुणांसह हे स्थान मिळवणारे विद्यापीठ ठरले आहे.

डॉ. मणि यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथून कृषि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २५ जुलै २०२२ रोजी कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात नवचैतन्य आणले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी-केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी-केंद्रीत शिक्षण, नवोन्मेष-केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी-केंद्रीत प्रशासन या दिशेने कार्यरत आहे.

“हा सन्मान विद्यापीठ परिवाराचा आहे” – कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. मणि म्हणाले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. आधुनिक कृषि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीस हातभार लावणे हेच माझे ध्येय आहे.”

या यशाबद्दल विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठांपैकी एक म्हणून अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande