
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। वातावरणातील सर्वाधिक बदलाचा काळ व धुळीचे वाढते प्रमाण या दोन गोष्टींमुळे न्यूमोनियाच्या संसर्गात अंदाजे १० टक्के वाढ दिसून येत आहे. न्यूमोनिया टाळण्यासाठी सकस आहार, आरोग्यदायी जीवनशैली जपत वेळेत उपचार महत्त्वाचे ठरतात.यावर्षी सोलापूर परिसर वातावरणातील सर्वांत मोठ्या बदलांना सामोरे जात आहे. मोठ्या पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग वाढला आहे. न्यूमोनियाचा संसर्ग हा कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. विशेषतः प्रतिकारक्षमता कमी असलेल्या बालकापासून व वृद्धापर्यंत सर्वांना होऊ शकतो. न्यूमोनिया हा जिवाणू व इन्फ्लूएंझा विषाणू या दोन्ही कारणांनी होऊ शकतो.सर्वसाधारणपणे सकस आहार व आरोग्यदायी जीवनशैलीने या आजारापासून दूर राहता येते. अनेक वेळा सर्दी- तापाचा आजार विषाणूजन्य असतो. पण, विषाणूजन्य आजारानंतर प्रतिकारक्षमता कमी झाल्यास पुन्हा न्यूमोनियाचा संसर्ग होतो. त्यामुळे प्रतिकारक्षमता कमी झाल्यास ती सामान्य होईपर्यंत कोणताही संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लसीचा दिलासा न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी लस देखील उपलब्ध आहे. ६५ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी लस घ्यायला हवी.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड