आधुनिक विज्ञानासोबत भारतीय ज्ञानपरंपराही जपा - कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। संस्कृत ही भारतीय संस्कृतीची आत्मा आहे. आजच्या पिढीने आधुनिक विज्ञानासोबत भारतीय ज्ञानपरंपरेचंही अध्ययन करावे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सु
आधुनिक विज्ञानासोबत भारतीय ज्ञानपरंपराही जपा - कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। संस्कृत ही भारतीय संस्कृतीची आत्मा आहे. आजच्या पिढीने आधुनिक विज्ञानासोबत भारतीय ज्ञानपरंपरेचंही अध्ययन करावे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलतर्फे आयोजित ‘पूजनीय दादासाहेब एकबोटे जिल्हास्तरीय आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा’ व ‘गुरुवर्य व. ह. देशपांडे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ’ सोसायटीच्या सभागृहात पार पडला.यावेळी डॉ. गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे होते. या वेळी संस्‍थेचे सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य निवेदिता एकबोटे, शाळा समितीचे अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, तसेच नीलिमा खिरे, डॉ. नंदकिशोर एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्कृत पाठांतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ध्येय नेहमीच सर्वांगीण विद्यार्थी घडविणे हे राहिले आहे. संस्कृतसारख्या भाषेतून मूल्यनिष्ठ शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande