
चेन्नई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय वायुदलाचे एक पीसी-7 पिलाटस बेसिक ट्रेनर विमान शुक्रवारी नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांबरम, चेन्नईजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने पायलट वेळेवर सुरक्षित बाहेर पडल्यामुळे कुठलीही जीवित-हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
माहितीनुसार, ही घटना तांबरम एअर फोर्स स्टेशनच्या जवळ दुपारी सुमारे २ वाजता घडली. पिलेटस पीसी-7 एमके -II हे विमान नव्या पायलटांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते. हे विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते, तेव्हाच अचानक काही बिघाड झाला. पायलटने तत्काळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमान जमिनीवर कोसळले. सुदैवाने पायलटने स्वतःला वेळेत बाहेर काढले.
वायुदलाने सांगितले की ही उड्डाण मोहीम सामान्य प्रशिक्षण मिशनचा भाग होती. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (चौकशी समिती) स्थापन करण्यात आली आहे, जी या प्रकरणाची सखोल तपासणी करेल.घटनेच्या ठिकाणी तात्काळ राहत आणि सुरक्षा पथके पाठवण्यात आली. स्थानिक प्रशासनानेही वायुदलाला आवश्यक ती मदत केली.
या अपघातानंतर वायुदलाने स्पष्ट केले की उड्डाण सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राधान्य आहे आणि चौकशी अहवाल आल्यानंतर आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode