
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी अर्ज भरला असून त्याच पहिल्या नगराध्यक्षा होतील, हे निश्चित आहे. त्यांच्याच दोन उमेदवारांनी नगरसेवकासाठीही अर्ज भरले आहेत. दुसरीकडे चार दिवसांत विरोधकांकडून एकही अर्ज भरलेला नाही.
अपक्ष उमेदवारास अर्जासोबत पाच तर राजकीय पक्षाच्या उमेदवारास एक सूचक लागतो. ‘पाण्यात राहून माशाशी वैर नको’, या म्हणीप्रमाणे काहीजण निवडणुकीस इच्छुक असले, तरी त्यांना सूचक मिळणार नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे.अनगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून त्याठिकाणी पाटील कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही त्यांना विरोध केला नाही. गावात एकोपा असल्याने विरोधकांनीही कधी त्याठिकाणी लक्ष घातले नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये अनगर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. आता पहिल्यांदाच नगरपंचायतीसाठी मतदान होत असून त्याठिकाणी एकूण ११ हजार मतदार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड