बिरसा मुंडा : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील दीपस्तंभ
- बिरसा मुंडा जयंतीनिमित्त.... भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांचे योगदान केवळ संघर्षापुरते मर्यादित नसून त्यांनी एका समाजाला, एका संस्कृतीला आणि एका युगाला नवसंजीवनी दिली. त्यात ‘धरती आबा’ म्हणून ओळखले जाणारे महा
बिरसा मुंडा


- बिरसा मुंडा जयंतीनिमित्त....

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांचे योगदान केवळ संघर्षापुरते मर्यादित नसून त्यांनी एका समाजाला, एका संस्कृतीला आणि एका युगाला नवसंजीवनी दिली. त्यात ‘धरती आबा’ म्हणून ओळखले जाणारे महान क्रांतिकारक, सामाजिक सुधारक व जननायक बिरसा मुंडा हे नाव आदराने उच्चारले जाते. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील छोटानागपूर पठारातील उलिहातू या छोट्याशा गावात जन्मलेल्या या महान योद्ध्याने केवळ आदिवासींच्या अधिकारांसाठी लढा दिला नाही, तर भारतदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यंदा आपण त्यांच्या १५०व्या जयंतीचा उत्सव साजरा करीत आहोत. हा केवळ स्मरणाचा क्षण नाही, तर त्यांचा आदर्श, विचार आणि लढ्याच्या परंपरेचा पुनर्जागरण करण्याचा अवसर आहे.

बिरसा मुंडा हे ज्या काळात जन्मले, तो काळ भारतावर ब्रिटिशांच्या वर्चस्वाचा होता. ब्रिटिशांनी देशातील जनतेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जखडून ठेवले होते. विशेषतः झारखंड, ओडिशा, बिहार या भागातील आदिवासी समाजावर ब्रिटिश शासन, जमींनदार आणि महाजन त्रिकूटाने अत्याचाराचा डोंगर कोसळवला होता. त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात होत्या, पिढ्यानपिढ्या शेती करून उपजीविका करणारे हे लोक बेघर होत होते, आणि त्यांना गुलामगिरीच्या गर्तेत ढकलले जात होते. अशा अंधकारमय परिस्थितीत या समाजाच्या हृदयातून एक ज्वाला पेटली होती आणि ती ज्वाला होती बिरसा मुंडांची.

बालपणापासूनच बिरसांना अन्यायाविरुद्ध तीव्र असंतोष होता. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजात शोषण, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा आणि धार्मिक फसवणूक पाहिली होती. ब्रिटिश राजवटीत आदिवासींची जमीन “सरकारी मालकीची” घोषित करून, ती गैरआदिवासी जमीनदार व व्यापाऱ्यांना देण्यात आली होती. या अन्यायाविरुद्ध बिरसांनी आपल्या लोकांना एकत्र केले आणि एक नवे सामाजिक व राजकीय आंदोलन उभारले त्यालाच “उलगुलान” म्हणजेच “महान बंड” म्हटले जाते. हे बंड केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हते, तर संपूर्ण अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध होते.

बिरसा मुंडा यांनी आपल्या विचारांद्वारे आदिवासी समाजात जागृती निर्माण केली. त्यांनी सांगितले की “आपली जमीन, आपले जंगल आणि आपले पाणी हेच आपले जीवन आहे.” त्यांनी आदिवासींना गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षण, आत्मनिर्भरता आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले. “धरती आबा” म्हणून लोक त्यांना मानू लागले, कारण त्यांनी आपल्या मातृभूमीला माता समजले आणि तिचे रक्षण करणे हेच आपला धर्म मानले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने आपला स्वतंत्र धर्म, संस्कृती आणि ओळख टिकवून ठेवण्यासाठी एक व्यापक चळवळ उभारली होती.

१८९९ मध्ये बिरसा मुंडांनी छोटानागपूर प्रदेशात “मुंडा आंदोलन” उभारले. या आंदोलनाचे घोषवाक्य होते “अबुआ दिशुम, अबुआ राज” म्हणजे “आपली जमीन, आपले राज्य.” त्यांनी आपल्या अनुयायांना हिंसाचारापेक्षा आत्मसन्मानाची लढाई लढण्यास प्रेरित केले. ब्रिटिश सरकारच्या शोषणकारी भूमिसुधार कायद्यांविरोधात त्यांनी जमिनींचे रक्षण करण्यासाठी जनतेला संघटित केले. या बंडाने ब्रिटिश सरकार हादरून गेले. बिरसा मुंडा हे केवळ स्थानिक नायक राहिले नाहीत, तर ते भारतातील पहिल्या स्वातंत्र्यवीरांच्या श्रेणीत स्थान मिळवून गेले.

बिरसांच्या विचारसरणीत समाजसुधारणेचे तत्त्वही स्पष्ट दिसते. त्यांनी आपल्या समाजातील अंधश्रद्धा, मद्यपान, जादूटोणा आणि भोंदूपणाविरुद्ध तीव्र आवाज उठवला. त्यांना वाटत होते की जोपर्यंत आदिवासी समाज स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणत नाही, तोपर्यंत बाहेरील अत्याचाराला तोंड देता येणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांना संयम, सत्य आणि परिश्रमाचे शिक्षण दिले. त्यांनी आदिवासी धर्माला एका नैतिक चौकटीत बांधून सामाजिक एकता प्रस्थापित केली.

त्यांचे विचार फक्त समाजपरिवर्तनापुरते मर्यादित नव्हते तर त्यात स्वातंत्र्याचा गाभा होता. त्यांनी सांगितले की “इंग्रज सरकार ही आपल्या भूमीवरील परकी सत्ता आहे आणि तिचे उच्चाटन हे आपले परम कर्तव्य आहे.” या विचारांनी पुढील स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक नेत्यांना प्रेरणा दिली. गांधीजींच्या ‘सत्याग्रह’ आणि ‘स्वावलंबन’ या तत्त्वांपूर्वीच बिरसा मुंडांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश आपल्या लोकांना दिला होता.

१८९५ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना अटक करून तुरुंगात डांबले, परंतु त्यांची क्रांतीची ज्योत विझली नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या अनुयायांना संघटित केले. मात्र, ब्रिटिश सरकारला त्यांचा प्रभाव सहन झाला नाही. १९०० मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि ९ जून १९०० रोजी रांचीच्या तुरुंगात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे वय फक्त २५ वर्षांचे होते. पण या तरुण क्रांतिकारकाने अल्पायुष्यात केलेले कार्य भारतीय इतिहासात अमर झाले.

बिरसा मुंडा यांच्या बलिदानाने आदिवासी समाजात नवचेतना निर्माण झाली. ब्रिटिश सरकारला अखेर “छोटानागपूर टेनन्सी अ‍ॅक्ट” मंजूर करावा लागला, ज्यामुळे आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण झाले. हा कायदा आजही त्यांच्या लढ्याचे फलस्वरूप म्हणून ओळखला जातो. त्यांच्या आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवा सामाजिक पाया दिला गेला. स्वराज्य हा केवळ राजकीय संकल्प नाही, तर तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुक्तीचाही मार्ग आहे, हे बिरसांनी दाखवून दिले.

आज बिरसा मुंडा हे केवळ एका आदिवासी समाजाचे नायक राहिलेले नाहीत; ते भारताच्या सामाजिक न्यायाच्या, समतेच्या आणि स्वाभिमानाच्या चळवळीचे प्रतीक झाले आहेत. १५ नोव्हेंबर हा दिवस आज “जनजातीय गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ आदरांजली देण्याचा नाही, तर त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा आहे. त्यांनी शिकवलेली एकता, परिश्रम, आणि स्वाभिमानाची शिकवण आजही भारताला नवी दिशा देते. त्यांचा लढा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता, तर शतकानुशतके चालत आलेल्या शोषणाच्या व्यवस्थेविरुद्ध होता. त्यांनी समाजातील दुर्लक्षित वर्गांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. आज जेव्हा आपण “सबका साथ, सबका विकास” याची चर्चा करतो, तेव्हा बिरसा मुंडांचे विचार त्यामागे जिवंतपणे उभे दिसतात. त्यांच्या जीवनातून आपल्याला समजते की सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य हे हातात हात घालून चालतात.

भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता होय. बिरसा मुंडा यांनी या तीनही मूल्यांचे बीज आपल्या संघर्षातून रोवले. त्यांच्या प्रेरणेने आज अनेक आदिवासी तरुण शिक्षण, रोजगार आणि राजकारणाच्या क्षेत्रात पुढे येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या नावाने विद्यापीठे, संग्रहालये, स्मारके उभारली आहेत. पण खरी आदरांजली तीच, जेव्हा आपण त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवू, शोषणमुक्त समाज, पर्यावरणसंवर्धन, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेची दिशा स्वीकारू.

आजच्या काळात, जेव्हा जागतिकीकरणाच्या युगात आदिवासी समाज पुन्हा आर्थिक आणि सांस्कृतिक आव्हानांना सामोरे जात आहे, तेव्हा बिरसा मुंडांचा संदेश पुन्हा नव्याने स्मरणात आणण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले होते की “धरती ही आई आहे, तिचे रक्षण हेच आपला धर्म आहे.” हा विचार आज पर्यावरणीय संकटांच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तीच, जी निसर्गाशी सुसंवाद राखते.

बिरसा मुंडा यांचे जीवन म्हणजे क्रांती, अध्यात्म आणि सामाजिक न्याय यांचा त्रिवेणी संगम होते. त्यांचा संघर्ष हे दाखवतो की एका तरुणाच्या धैर्याने संपूर्ण व्यवस्था हादरवता येते, जर त्याच्या मनात जनतेसाठी प्रेम आणि न्यायाची ज्वाला असेल तर. त्यांनी आपल्या अल्पायुष्यात जे कार्य केले, ते आजही भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आहे.

अखेर, बिरसा मुंडा हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहातील जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना केवळ स्मरणात ठेवू नये, तर त्यांच्या आदर्शांनुसार वर्तन करावे. कारण बिरसा मुंडा म्हणजे स्वाभिमानाची मूर्ती, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आणि भारताच्या आत्म्याचा निखळ दीपस्तंभ होते. त्यांचा विचार भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सदैव दीपस्तंभासारखा उजळत राहील. देशासाठी, समाजासाठी, आणि प्रत्येक त्या माणसासाठी जो न्याय आणि समानतेसाठी झगडत आहे.

डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) मो. ९९६०१०३५८२, ईमेल - bagate.rajendra5@gmail.com

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande