
बीजिंग , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।चीनचे अंतराळात अडकलेले तीन अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांच्या यानाला अंतराळातील मलब्याचा एक तुकडा जाऊन धडकला होता. आता नवीन क्रू अंतराळात पाठवला जात असून, त्यांच्या यानामधून हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील.
चीनच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानकावर सहा महिन्यांच्या रोटेशनवर होते आणि 1 नोव्हेंबर रोजी नवीन पथकाच्या आगमनानंतर चार दिवसांनी पृथ्वीवर परत येणार होते. मात्र, त्यांच्या शेनझोऊ-20 अंतराळयानाला अंतराळातील मलब्याच्या एका छोट्या तुकड्याची धडक बसल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांची परतीची योजना रद्द करण्यात आली होती. सरकारी माध्यमांनी सांगितले की आता ते शेनझोऊ-21 यानाने परत येत आहेत.
हे तीन अंतराळवीर — चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी — एप्रिलमध्ये तियांगोंग अंतराळ स्थानकावर गेले होते. चीनच्या मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ते (अंतराळवीर) चांगल्या स्थितीत आहेत, काम करत आहेत आणि सामान्यपणे राहत आहेत.”
चीनने 2003 मध्ये आपला मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर सतत प्रगती साधली आहे. चीनने स्वतःचे अंतराळ स्थानक उभे केले आहे आणि 2030 पर्यंत चंद्रावर मानव उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे. शेनझोऊ-21 या ताज्या मोहिमेत प्रयोगांसाठी उंदीर अंतराळात नेण्यात आले आहेत, जे चीनच्या अंतराळ कार्यक्रमात प्रथमच झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode