विज्ञान निष्ठा जपा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञान निष्ठा जपावी. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करुन जीवन सुखकर करावे,असा हितोपदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन सोहळ्यास सहभागी विद्यार्थ्यांन
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञान निष्ठा जपावी. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करुन जीवन सुखकर करावे,असा हितोपदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन सोहळ्यास सहभागी विद्यार्थ्यांना केला.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई, तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय, समर्थ नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा तापडिया नाट्यमंदिर येथे उत्साहात पार पडला.

प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) श्रीमती अश्विनी लाठकर या होत्या. उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा मेहेत्रे), प्राचार्य, डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय डॉ. सुनीता बाजपाई, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक दिलीप सिरसाट, समन्वयक डॉ. प्रभाकर गायकवाड आणि पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ‘अनेक महान वैज्ञानिकांच्या चरित्रामधून आपल्या लक्षात येते की, हे वैज्ञानिक विद्यार्थी दशेपासूनच प्रयोग करीत होते. सुरुवातीला त्यांचे प्रयोग उलटे-सुलटेही झाले, पण अथक प्रयत्नानंतर त्यांनी यश मिळविले. त्यांच्या या संशोधनामुळे आज आपले जीवन सुखकर झाले आहे. अशा प्रदर्शनातून सहभागी होणारे विद्यार्थी आज विविध संशोधन संस्थांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही वैज्ञानिक होण्याची खूप मोठी संधी या निमित्ताने मिळत आहे. आजही विविध सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. आपल्याला यावर मात करून विज्ञाननिष्ठ होणे अतिशय महत्त्वाचे आहे.’

अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती अश्विनी लाठकर यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली, तर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्रा. शंकर विधाते यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक दिलीप शिरसाट यांनी केले. प्राचार्यडॉ. सुनीता बाजपाई यांनीहीमनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन डॉ. शिला जिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कल्पना पातकोंडे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य,प्राध्यापक, मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक,बालवैज्ञानिक, विद्यार्थी, पालक, यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांतील विविध शाळांमधून निवड झालेल्या ११८ विज्ञान प्रकल्पांनी या जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दिनांक १३ व १४ नोव्हेंबर रोजी हे प्रदर्शन जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींना खुले असणार आहे. या प्रकल्पातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी उपलब्ध होईल.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या या पुढाकारामुळे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा यंदा विज्ञान-नवोन्मेषाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 'इन्स्पायर मानक अवॉर्ड' (प्रेरित संशोधनासाठी विज्ञानाच्या शोधात नवोपक्रम) ही केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची योजना असून, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, प्रयोगशीलता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन वाढविण्यासाठी राबवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande