
लातूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय प्रवर्गीय औषधे अर्थात शेड्युल्ड ड्रग्जची विक्री केली जावू नये अशा सक्त सूचना
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिलेल्या आहेत.
औषधे विक्रीची माहिती औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे आवश्यक असून लातूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या नियमांचे पालन करावे.
प्रवर्गीय औषधांचा वापर व्यसनासाठी केला जावू शकत असल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. आपल्या लातूर जिल्ह्यातील युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रमोद काकडे, बळीराम मरेवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
युवा वर्गातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार लातूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉक्टरांची चिट्टी असल्याशिवाय कोणताही विक्रेता प्रवर्गीय औषधांची विक्री करणार नाही, असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच औषध विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis