
- ठाकरेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष उमेदवारी
बदलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीनं आठ पक्षांची मजबूत युती उभी करत उमेदवार यादी अंतिम टप्प्यात नेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती शहरप्रमुख किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २० प्रभागांत उमेदवार निश्चित झाले असून उर्वरित चार प्रभागांसाठी उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाची ताकद आहे त्यानुसार जागावाटप ठरवले जात असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.
एकीकडे महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परस्परांविरुद्ध प्रचारात उतरले असताना, महाविकास आघाडीच्या तंबूत मात्र शांतता दिसून येत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूरचा समावेश असून येथे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा महाविकास आघाडीतून उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी केलेल्या पराभवाचा फायदा नगरपालिकेच्या रणधुमाळीतही होईल, असा दावा आघाडीने केला.
महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपाई (आर के), बहुजन मुक्ती पार्टी आणि मनसे या आठ पक्षांचा समावेश असल्याची औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. शहराचा सर्वांगीण विकास हेच या आघाडीचे प्रमुख ध्येय असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असून महायुतीप्रमाणे चिखलफेक करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश देशमुख यांनी लोकसभेत केंद्रीय मंत्र्यांचा पराभव घडवून आणल्यानंतर आता महायुतीलाही पराभूत करण्याचे आव्हान स्वीकारल्याचा दावा केला.
महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपात शिवसेना (ठाकरे) १२, बहुजन मुक्ती पार्टी ११, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ६, काँग्रेस ५, मनसे ३, वंचित बहुजन आघाडी ५, आम आदमी पार्टी २ आणि रिपाई (आर के) १ जागेवर स्पर्धेत असेल. उर्वरित जागांबाबत लवकरच निर्णय घेऊन अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule