
लातूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोल नाक्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा हृदयद्रावक अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले तरुण हे माधव गुलाब लोहगावे (वय २४) आणि संतोष संभाजी चिंतले (वय २०) असे आहेत. हे दोघेही कामासाठी पुण्याकडे निघाले होते. त्यांच्या मोटारसायकलला (दुचाकी) एका कारने हडोळतीपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर धडक दिली, यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. कारची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघात झाल्यानंतर कार चालक तात्काळ घटनास्थळावरून आपली गाडी सोडून पळून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हडोळती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन, फरार झालेल्या कार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्याला कामासाठी निघालेल्या या दोन तरुणांचा वाटेतच असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis