
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
मराठवाड्यात तीन महिन्यात 269 शेतकऱ्यांनी आपले प्राण सोडले आहेत. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे तब्बल 71 आत्महत्या झाल्या आहेत.
1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान, विभागात एकूण 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 106 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांचे आकडे पुढीलप्रमाणे
बीड – 71 छत्रपती संभाजीनगर – 50
हिंगोली – 37 परभणी – 33 धाराशिव – 31 लातूर – 18 जालना – 13
या आत्महत्यांमागे मुख्यत्वे करून कर्जबाजारीपणा, शेतीचा वाढता खर्च, शेतमालाला मिळणारा अल्पभाव, नापिकी, खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज, तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे.
शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्याचा फारसा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात 87, फेब्रुवारीत 76 आणि मार्चमध्ये 106 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच तीन महिन्यात एकूण 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
177 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित
शासनाकडून अशा घटनांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 79 प्रकरणांत ही मदत मंजूर करण्यात आली आहे, तर 13 प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आली आहेत. उर्वरित 177 प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis