
जळगाव, 14 नोव्हेंबर (हिं.स.)जळगाव मधील वाटिका आश्रम परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात अंगावर गरम पाणी पडून झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटीका आश्रम, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.वाटिका आश्रम परिसरात वास्तवास असलेले जितेंद्र पाटील हे एसटी वर्कशॉपला कामाला आहेत. आठ दिवसांपूर्वी चेतन घरी खेळत होता, त्याने त्याच्या आईकडे कांदेपोहे खाण्याचा हट्ट केला, त्याची आई पोहे तयार करण्यासाठी कांदे कापत असताना, चेतन खेळत असताना अचानक बाथरुममध्ये गेला. तेथे बादलीत ठेवलेले गरम पाणी त्याच्या अंगावर पडले.गरम पाण्यामुळे चेतन गंभीररित्या भाजला गेला होता. त्याला तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, भाजलेल्या जखमांमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वाटीका आश्रम परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर