

- आंदोलकांनी शेकडो ट्रॅक्टर पेटवले, हजारो टन ऊस जळून खाक
बंगळुरू, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - ऊसाला 3,500 रुपये प्रति टन ऊस दर मिळावा, यासाठी कर्नाटकमध्ये आठवडाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान मुधोळ, बागलकोट आणि विजयपुरा या जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष चिघळला. मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर शहराजवळील संगनट्टी क्रॉस येथे आंदोलकांनी शेकडो ट्रॅक्टर पेटवले. या घटनेत हजारो टन ऊस जळून खाक झाला आहे. तीन तालुक्यांमध्ये भारतीय न्याय संहितेचे (बीएनएस) कलम १६३ लागू करण्यात आले आहे
राज्य सरकारने काढलेला प्रतिटन 3300 रुपये देण्याचा तोडगा अमान्य करत, मुधोळमध्ये शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन 3,500 ऊस दर देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. सुरुवातीला निपाणी-महालिंगपूर राज्य महामार्गावर त्यांनी वाहतूक रोखली. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याच्या शेडजवळ उसाने भरलेले ट्रॅक्टर पेटवून दिले. घटनास्थळी सुमारे २०० हून अधिक ट्रॅक्टर उभे होते. ऊस पेटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
ऊस दर घोषित करण्याच्या मागणीसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरु महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही घटना घडली होती.
शेतकऱ्यांचे नेते मुत्तप्पा कोमर यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी गुंडांनी हिंसाचार केला. काही शेतकऱ्यांनी जमखंडी तालुक्यातील सिद्धापूरजवळ हुबळी-सोलापूर महामार्ग रोखला, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. हुनूर आणि हुल्याल गावांमध्येही रस्ते अडवण्यात आले.
एसपी सिद्धार्थ गोयल म्हणाले की, शेतकऱ्यांनी दगडफेकही केली, ज्यामध्ये काही पोलिस जखमी आणि काही लोक जखमीही झाले. त्यांनी स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर, बागलकोटच्या उपायुक्तांनी बीएनएसएस-२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केले. ज्यात १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जमखंडी, मुधोळ आणि रबकवी-बनाहट्टी तालुक्यांमध्ये निदर्शने, संप आणि कोणत्याही मेळाव्यावर बंदी घालण्यात आली.
शेतकरी नेते सुभाष शिरबूर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आग लावली नाही. त्यांच्या मते, कारखान्याशी संबंधित लोक पोलिसांसमोरच आग लावत होते. पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले की, शेकडो टन ऊस आणि लाखो रुपयांचे ट्रॅक्टर जळताना पाहून मन हेलावून जाते. काँग्रेस सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आणि मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची मागणी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत, परंतु सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी