
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना त्वरीत औषधोपचार सुरु करून पूर्ण मात्रा देणे हे कुष्ठरोग निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे निदान निश्चितीसाठी पालक मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार असून, ती यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
समाजातील सर्व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन निदाननिश्चिती नंतर तात्काळ औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. कुष्ठरुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास अथवा विलंब झाल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना तर करावा लागतोच आणि त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सर्व कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सोमवार, दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर, 2025 या कालावधीमध्ये विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये कुष्ठरुग्णांचे संशयित शोधून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान निश्चितीनंतर तात्काळ उपचार सुरु करण्यात येणार आहेत. या कालावधीत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख लोकसंख्येची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1135 चमूमार्फत 11 लाख 23 हजार 836 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा व पुरुष स्वयंसेवक हे घरोघरी जावून संशयित कुष्ठरुग्ण शोधणार आहेत. संशयित कुष्ठरुग्णांना निदान निश्चितीसाठी आरोग्य संस्थेमध्ये पाठविणार आहेत. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर तातडीने मोफत औषधोपचार सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis