
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून महिला किसान शक्तीपंख योजना अंतर्गत जिल्ह्यातील अकरा महिला बचतगट ग्रामसंघाला 40 टक्के अनुदानावर ड्रोन देण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांवरील औषध फवारणी आता सोपी होणार आहे. त्याची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकरी महिला सशक्तीकरण व्हावे, यासाठी कृषी विभागाने महिला किसान शक्तीपंख योजना आणली असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 50 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून प्रत्येक तालुक्यात एक ड्रोन देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास औषध फवारणीसाठी एक ड्रोन उपलब्ध होणार आहे.
महिला किसान शक्तीपंख योजनेतून ड्रोन मिळावे, यासाठी जिल्ह्यातून 148 बचतगट ग्रामसंघाचे प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यातील अकरा बचतगट ग्रामसंघाला लॉटरीतून ड्रोन देण्याची निवड करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून एक बचतगट ग्रामसंघ वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड