

मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। मासेराटीनं भारतातील लक्झरी इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपलं पहिले पाऊल टाकत ग्रेकाले फोल्गोर ही पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात सादर केली आहे. 1.89 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत आलेली ही कार ग्रेकाले रेंजमध्ये स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1.31 कोटी, मॉडिना 1.40 कोटी आणि टॉप-एंड ट्रोफिओ 1.96 कोटी रुपयांपासून सुरू होते. यामुळे फोल्गोर ही इलेक्ट्रिक आवृत्ती ट्रोफिओपेक्षा थोडी स्वस्त ठरते, ज्यामुळं इलेक्ट्रिक कारप्रेमींना एक आकर्षक पर्याय मिळाला आहे.
105 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह, प्रत्येक अॅक्सलवर एक अशी ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्सची रचना या एसयूव्हीला 550 हॉर्सपॉवरची ताकद आणि 820 न्यूटन-मीटर टॉर्क प्रदान करते. केवळ 4.1 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडण्याची क्षमता आणि 220 किमी/ताशी कमाल वेग आहे. मात्र, 2,480 किलोग्रॅम वजन असूनही तिची ही कामगिरी प्रभावी आहे.
एका चार्जवर 501 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता आणि 22 kW एसी तर 150 kW डीसी फास्ट चार्जिंगसारखे पर्याय ही कार दैनंदिन वापर आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयीस्कर बनवतात. बाह्य डिझाइनमध्ये मासेराटीची सिग्नेचर ओळख कायम ठेवत, कमी उंचीची काँकेव्ह ग्रिल, डी-पिलरवरील ट्रायडेंट लोगो, रिडिझाइन केलेले बंपर्स आणि ब्रॉन्झ ब्रेक कॅलिपर्ससारख्या आधुनिक गोष्टींचा आकर्षक समावेश आहे. ग्राहकांना 24 एक्सटीरियर कलर पर्याय आणि नवीन अॅलॉय व्हील डिझाइन्समुळं कस्टमायझेशनची मोठी संधी मिळते.
इंटिरियरमध्येही लक्झरीचा अनुभव तसाच प्रभावी आहे. 12.3-इंच ड्रायव्हर डिस्प्ले, 12.3-इंच सेंट्रल टचस्क्रीन आणि स्वतंत्र 8.8-इंच क्लायमेट कंट्रोल स्क्रीन या तिन्ही डिजिटल सेटअपमुळं केबिन अधिक आधुनिक आणि वापरण्यास सोयीस्कर बनतो. स्टेअरिंग व्हीलवर पॅडल शिफ्टर्स आणि विविध कंट्रोल्स आहेत. 1,285 वॅटचा सोनस फॅबर ऑडिओ सिस्टम, 21 स्पीकर्स, हीटेड लेदर स्टीअरिंग व्हील आणि 16 अपहोल्स्ट्री पर्याय मुळे प्रीमियम अनुभव अधिक समृद्ध होतो.
सुरक्षेच्या बाबतीत, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर्स, लेव्हल-2 एडीएएस आणि 360° कॅमेऱ्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनतं. भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत मासेराटी ग्रेकाले फोल्गोरचं आगमन हा लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटीचा नवा अध्याय ठरणार आहे. स्पोर्टी परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्सची सांगड घालणाऱ्या या एसयूव्हीनं मासेराटीनं भारतातील भविष्यातील ई-मोबिलिटीचा मार्ग स्पष्ट केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule