
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात करण्यात आला आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.
महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजाचे स्वरूप आणि प्रक्रिया याबद्दल आज सावित्रीबाई फुले सभागृह येथे माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जांभळे पाटील बोलत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु