नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी कडक सूचना
बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जि
अ


बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी

नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. बालविवाहमुक्त नांदेड जिल्हा हा उद्देश साध्य करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एस.बी.सी. मुंबई आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्पा’बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रेमीला निलावार, प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, मोनाली धुर्वे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी पंचायत विभाग, शिक्षण, एकात्मिक बालविकास, आरोग्य, महिला व बालविकास आणि उमेद या सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर सतर्क राहून सर्व शक्य उपाययोजना अंमलात आणाव्यात.

बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून त्याला सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या आळा बसावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, भटजी, मौलवी, वांजत्री, सोनार, मंडप डेकोरेशन व फोटोग्राफर यांची यादी तयार करून त्यांच्यामार्फतही बालविवाह रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश दिले. “या सर्व घटकांना त्यांच्या उपस्थितीत बालविवाह होणार नाहीत याबाबतची जनजागृती करावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे कार्यरत राहाव्यात, संशयास्पद विवाह समजताच शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील यांनी तातडीने कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी जे जे करता येईल त्या सर्व उपाययोजना करा आणि जनजागृतीवर अधिक भर द्या,” असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बैठकीत सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande