
अमरावती, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर निश्चित आहे. त्यामुळे उमेदवारांना केवळ पाच दिवसच प्रचारासाठी उपलब्ध राहणार आहेत. मर्यादित वेळेत मतदारांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी जोरदार मोहीम उभी केली आहे.
नामनिर्देशन परत घेण्याची मुदत संपताच उमेदवार ‘होम टू होम’ संपर्क मोहिमेत व्यस्त होणार आहेत. प्रत्येक प्रभागात मतदारांना भिडण्यासाठी नियोजनबद्ध रणनीती आखली जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच प्रमुख पक्षांमध्ये ‘इनकमिंग-आउटगोइंग’ला वेग आला आहे. काही इच्छुकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला असून, काहींनी स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली आहे. सोशल मीडियावर जोरदार प्रचार या निवडणुकीत सोशल मीडिया उमेदवारांच्या प्रचाराचे प्रभावी साधन ठरले आहे. व्हॉट्सऍप गट, फेसबुक, इन्स्टाग्राम पोस्ट्स आणि प्रभाग पातळीवरील भेटींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. थेट संवाद आणि वैयक्तिक नाते जपणे हेच त्यांच्या प्रचाराचे प्रमुख सूत्र राहिले आहे. प्रत्येक प्रभागात काट्याची लढत अपेक्षित असल्याने प्रत्येक मताचे मोल वाढले आहे. बंडखोरीचा धोका कायम नगराध्यक्ष पदासाठी एकाच पक्षातून अनेक इच्छुक असल्याने बंडखोरीचे सावट निर्माण झाले आहे. पक्षनेते अंतर्गत मतभेद टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र अनेक पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मर्यादित वेळ, तीव्र स्पर्धा आणि बंडखोरीच्या छायेत ही निवडणूक रंगणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी