
* सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका या देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यानंतर पंतप्रधान दुपारी 12:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील देवमोगरा येथील मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. सुमारे 2:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. या प्रसंगी पंतप्रधान 9,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.
बुलेट ट्रेन प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगात पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुमारे 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352 किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून, तर 156 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे. हा प्रकल्प भारताच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातील तब्बल 465 किलोमीटर (सुमारे 85 टक्के मार्ग) उड्डाणपुलांवर असणार आहे, ज्यामुळे जमिनीचा कमी वापर आणि अधिक सुरक्षितता सुनिश्चित होते. आतापर्यंत 326 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले असून 25 पैकी 17 नदीवरील पूल बांधले गेले आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांवर येईल. यातून शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि आरामदायी ठरेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल तसेच संपूर्ण कॉरिडॉर परिसराचा विकास होईल.
सुरत–बिलीमोरा विभाग सुमारे 47 किलोमीटर लांबीचा असून हा विभाग कामाच्या अंतिम टप्प्यात आहे. येथील नागरी बांधकाम आणि ट्रॅक-बेड घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरत स्थानकाचे डिझाइन शहराच्या जगप्रसिद्ध हिरे उद्योगापासून प्रेरित आहे, ज्यामध्ये सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा संगम दिसून येतो. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि किरकोळ विक्री केंद्रे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या स्थानकाला सुरत मेट्रो, शहर बस सेवा आणि भारतीय रेल्वे नेटवर्कशी सुसंगत बहु-आयामी जोडणी दिली जाणार आहे.
डेडियापाडा येथील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. पंतप्रधान ‘प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या अंतर्गत बांधण्यात आलेल्या 1 लाख घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होतील.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सुमारे 1,900 कोटी रुपयांच्या 42 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच 228 बहुउद्देशीय केंद्रे समुदाय-आधारित उपक्रमांसाठी हब म्हणून कार्य करतील. याशिवाय, आसाम मेडिकल कॉलेज, डिब्रूगड येथे ‘सेंटर ऑफ कॉम्पिटन्स’ आणि मणिपूरमधील इंफाळ येथे आदिवासी संस्कृती आणि वारशाचे संवर्धन करण्यासाठी ‘जनजातीय संशोधन संस्था’ भवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल,
याव्यतिरिक्त, पंतप्रधान गुजरातमधील 14 आदिवासी जिल्ह्यांसाठी 250 बसेसना हिरवा झेंडा दाखवणार असून, ज्यामुळे आदिवासी भागांमध्ये संपर्क सुविधेत सुधारणा होणार आहे.
पंतप्रधान आदिवासी भागांमधील संपर्क सुविधा वाढविण्यासाठी 748 किमी नव्या रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करतील आणि डीए-जेएजीयूए अंतर्गत 14 ‘जनजातीय बहु विपणन केंद्रांसाठी पायाभरणी करतील, जी समुदाय विकास केंद्र म्हणून कार्य करतील. 2,320 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 50 नव्या एकलव्य आदर्श निवासी शाळांचे देखील पंतप्रधान भूमिपूजन करतील, ज्यामुळे आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule