उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान उपनेते बाळासाहेब माने यांच्या स्नुषा शिवा
उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी


रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिवानी माने यांना रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान उपनेते बाळासाहेब माने यांच्या स्नुषा शिवानी माने या उच्चशिक्षित असून, समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे आलेल्या आहेत. मनमिळाऊ आणि सेवाभावी वृत्तीमुळे ‘स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार’ अशी ओळख त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिली असून नव्या नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केले आहे.

पालिकेच्या निवडणुकीबाबात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमध्ये मात्र अजूनही जागा वाटपावरून पेच कायम आहे. नगराध्यक्षपद आणि जागावाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा जाणार, यावरून तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे बाळ माने यांच्या या राजकीय डावाने आता चर्चेला नवे वळण दिले आहे. शिवानी माने यांच्या उमेदवारीचा उल्लेख सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या अंतर्गत बैठकीतही प्रमुख चर्चेचा विषय आहे.

शिवसेना शिंदे गटात शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर आणि समृद्धी मयेकर अशी अनेक नावे चर्चेत आहेत.

शिल्पा सुर्वे दोन वेळा नगरसेविका होत्या. स्मितल पावसकर यांनी तब्बल तीस वर्षे नगरसेविका म्हणून काम केले आहे. वैभवी खेडेकर आणि समृद्धी मयेकर या दोघींची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल का, याबाबतही उत्सुकता आहे, वरिष्ठ पातळीवरही यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.

राजकीय नेत्यांच्या या हालचालींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील समस्यांची मालिकाही तितकीच गंभीर आहे.

रस्त्यावरील खड्डे, कचऱ्याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, गटारांची कामे, भूमिगत एमएसईबी वायरिंग, केबल नेटवर्क यांसारख्या अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये रोष आहे. या सर्व समस्या सत्ताधारी पालकमंत्री उदय सामंत यांच्याच विरोधात लोकांच्या मनात नाराजी निर्माण करत असल्याची चर्चा आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी शहराने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने कल दिला होता. त्यामुळे यावेळीही शहरातील मतदारांची भावना ओळखणे हीच पालकमंत्र्यांची कसोटी आहे. योग्य उमेदवार निवडण्यात चूक झाली, तर मतदारांचा रोष सत्ताधाऱ्यांवर ओढवू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande