
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक अन सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली. इतकच नाही तर तालुका भाजपामय केला. सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्यजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली. गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक, एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती, तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली आहे. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात आहे. वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंड पणे सुरु होत गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड