
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। टाटा मोटर्स त्यांच्या लोकप्रिय पूर्ण-आकाराच्या एसयूव्ही — टाटा हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल आवृत्त्या ९ डिसेंबर रोजी बाजारात आणणार आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये नवीन १.५-लिटर TGDI टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाणार असून हे इंजिन ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये पहिल्यांदा सादर झाले होते. याच पॉवरट्रेनचा वापर २५ नोव्हेंबरला लाँच होणाऱ्या टाटा सिएरा एसयूव्हीमध्येही होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल मॉडेल्समध्ये कंपनी काही नवीन फीचर्सही देऊ शकते. सध्या हॅरियर आणि सफारी २.०-लिटर, ४-सिलेंडर डिझेल इंजिनवर चालतात, जे १७० पीएस पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असून हॅरियर १६.८० किमी/लि. (मॅन्युअल) आणि १४.६० किमी/लि. (ऑटोमॅटिक) असा तर सफारी १६.३० किमी/लि. (मॅन्युअल) आणि १४.५० किमी/लि. (ऑटोमॅटिक) असा दावा केलेला मायलेज देते.
पेट्रोल व्हेरिएंट्सची किंमत विद्यमान डिझेल मॉडेल्सपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. सध्या सफारी डिझेलची किंमत १४.६६ लाख ते २५.९६ लाख रुपये असून हॅरियरची किंमत १४ लाख ते २५.२५ लाख दरम्यान आहे.
दोन्ही एसयूव्हीमध्ये लेव्हल-२ ADAS तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यात ३६०° कॅमेरा, लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह स्टीअरिंग असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि हाय बीम असिस्ट यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
हॅरियर एमजी हेक्टर आणि जीप कंपासला तर सफारी एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा XUV700 आणि ह्युंदाई अल्काझारला टक्कर देत असल्याने पेट्रोल आवृत्त्यांमुळे टाटा मोटर्सची स्पर्धात्मकता आणखी वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule