अभिनेता कविश शेट्टीचा ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटाच्या पोस्टर वरील चार्मिंग, हँडसम लुकमध्ये दिसणाऱ्या अभिनेता कविश शेट्टीने एक वेगळीच हवा केलीय. त्याच्या या रुबाबदार लूकने सबंध तरुणाईला भुरळ घातली. आजवर साऊथ सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमधून महत्त्व
अभिनेता कविश शेट्टीचा ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटाच्या पोस्टर वरील चार्मिंग, हँडसम लुकमध्ये दिसणाऱ्या अभिनेता कविश शेट्टीने एक वेगळीच हवा केलीय. त्याच्या या रुबाबदार लूकने सबंध तरुणाईला भुरळ घातली. आजवर साऊथ सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत कविशने स्वतःचे स्थान निर्माण केलं. कन्नड ही मातृभाषा असलेला कविश मात्र आता मराठी मनाचा आहे. हो असं बोलण्यामागचं कारण म्हणजेच गेली काही वर्ष कविश महाराष्ट्रात राहतोय आणि महाराष्ट्राच्या मातीशी त्याची नाळ जोडली गेली आहे. महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठीमोळी संस्कृती याचा त्याच्यावर इतका प्रभाव पडलाय की, यामुळे त्याची जगण्याची पद्धत, बोलीभाषा, त्याचा मित्रपरिवार यांत बराच बदल झाला आहे आणि म्हणूनच ज्या मराठी मातीनं आपल्याला उभं केलं तिच्यासाठी काहीतरी करण्याची उमेद मनाशी घेऊन कविश शेट्टीने ‘आफ्टर ओएलसी’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना कविशला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अर्थात सुरुवात झाली ती भाषेपासूनच… पण महाराष्ट्रात राहिल्याने कुठेतरी मराठी भाषा त्याला ज्ञात होती त्यामुळे त्याने तितकसं दडपण न घेता अगदी हे आव्हान योग्यरित्या हाताळल.

चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना कविश म्हणाला, “मराठी भाषेत सिनेमा करणं हे माझं स्वप्न होतं कारण महाराष्ट्राच्या मातीशी जोडली गेलेली माझी नाळ. महाराष्ट्राने मला माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं उभं केलं. अगदी माझं करिअर सेट केलं. त्यामुळेच मला आपल्या मराठी माणसांसाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातून मी प्रेक्षकांच्या भेटीस आलो. चित्रपटातील माझ्या या भूमिकेचे लेखन मी केल असल्याने मला ही भूमिका स्वतःला साकारायची होती. मराठी चित्रपटात काम करताना मराठी भाषेचं अर्थात एक आव्हान होतं पण इतकी वर्ष महाराष्ट्रात राहिल्याने कुठेतरी ते आव्हान मी सहाजिकरित्या पेलवलं. भूमिकेसाठी मी केस वाढवले ते शूट संपेपर्यंत सांभाळणं हादेखील एक टास्कच होता. यानंतर बोलायचं झालं तर, लोकेशन. चित्रपटातील ॲक्शन सीन्स अशा ठिकाणी शूट झालेत जिथे अगदी सोप्या पद्धतीने काहीही मिळणं वा कोणती मदत मिळणं फार कठीण आहे. त्यामुळेच ॲक्शन सीन दरम्यान, ‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘सलारचे फाईट मास्टर विक्रम मोर यांनी खूप सांभाळून घेतलं. या चित्रपटात ॲक्शन सीन्स करणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक ठरलं. एका सीन दरम्यान तर उंच उडी टाकताना माझा तोल गेला आणि मला दुखापत झाली यावेळी तर तब्बल सहा महिने मी बेडरेस्ट घेतला आणि आमच्या चित्रपटाचे शूटिंग थांबलं. सहा महिन्यानंतर रिकव्हर होऊन मी पुन्हा एकदा शूटिंगला परतलो आणि चित्रपटाच शूटिंग पूर्ण केलं. अशी एकूणच अशी बरीच आव्हान चित्रपटात होती मात्र आमच्या संपूर्ण टीमने एकत्र मेहनत करत त्यावर मात केली आणि आज हा सिनेमा तयार असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande