
पुणे, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। एकमेकांच्या कुटुंबाचा जाहीरपणे उध्दार करणारे नेते दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्याने शहरात सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेमसुख कटारिया यांचे नागरी हितसंरक्षण मंडळांच्या आश्रयाला आता या मंडळाला कायम विरोध करणारे आले आहेत. कारण, राज्यातील सत्ताधारी भाजपने नागरी हितसंरक्षण मंडळाला आपल्या पदराखाली घेतले आहे.मागील दोन वर्षांत एकमेकांची उणीदुणी काढून व कुटुंबांचा उद्धार करून तसेच न्यायालयीन प्रक्रियेत विकासकामांना अडवून त्या कामावर मनाई आणून एकमेकांच्या तंगड्या पिरगळणारे, विकासकामांना खीळ घालणारे नेते निवडणुकीसाठी एकत्र आल्याने अनेक निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोणीही आयरा-गयरा येतो व मला तिकीट पाहिजे, पाच-पन्नास लोकांचा जमाव-युवक बरोबर आणतो व मला तिकीट द्या, असे म्हणतो. त्यामुळे प्रेमसुख कटारिया आणि भाजपचे आमदार राहुल कुल त्रस्त झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु