बीएमसी निवडणूक मतदार यादीतून ५८ हजारांहून अधिक नावे वगळली
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदारयाद्यांवरील आक्षेपांमुळे निर्माण झालेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदारयादीत मोठे बदल समोर आले आहेत. विधानसभ
BMC elections


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदारयाद्यांवरील आक्षेपांमुळे निर्माण झालेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदारयादीत मोठे बदल समोर आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ते १ जुलै २०२५ या सात महिन्यांच्या काळात एकूण ५८ हजार ६३२ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यात मुंबई शहरातील १४ हजार ४६० आणि मुंबई उपनगरातील ४४ हजार १७२ मतदारांचा समावेश असल्याची माहिती राज्य निवडणूक मुख्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण १ कोटी २३ लाख ७८ हजार ४१८ मतदारांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत हा आकडा १ कोटी २ लाख २९ हजार ७०८ होता. त्यामुळे यंदा एकूण २१ लाख ४८ हजार ७१० नवे मतदार वाढले आहेत. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी मुंबई शहरात २५ लाख ४३ हजार ६१० आणि उपनगरांत ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार होते. त्यात यंदा अनुक्रमे ३३ हजार २०१ आणि १ लाख ३९ हजार ८०२ नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईत यंदा एकूण १ लाख ७३ हजार ३ नवमतदार नोंदवले गेले आहेत.

फॉर्म ६ भरून शहरात २७ हजार २०० आणि उपनगरात १ लाख १३ हजार ९३६ अशा एकूण १ लाख ४१ हजार १३६ मतदारांनी नवीन नोंदणी केली आहे. विदेशातील भारतीय नागरिकांकडून फॉर्म ६ए द्वारे शहरात आठ आणि उपनगरांत ३५ अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच फॉर्म ८ए द्वारे शहरातील ५ हजार ९९३ आणि उपनगरातील २५ हजार ८३१ मतदारांनी दुरुस्ती अर्ज सादर केले आहेत.

दरम्यान, नावे वगळण्यासाठी ५८ हजार ६३२ मतदारांनी फॉर्म ७ भरले असून, या प्रक्रियेनंतर मुंबईतील एकूण १ लाख १४ हजार ३७१ नवीन मतदार आगामी निवडणुकांसाठी पात्र ठरणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande