
मुंबई, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। अखिल भारतीय सफाई कामगार युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला आ. कुमार आयलानी, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अमरजित मिश्रा, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी चरणसिंग टाक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून वाल्मिकी समाजातील कर्मचा-यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तळागाळातील सर्व वर्गातील लोकांना पुढे घेऊन जाणारी भाजपा असून वाल्मिकी समाजाचे भले भाजपाच करू शकते हा विश्वास वाटल्याने इतक्या मोठ्या संख्येने आज भाजपामध्ये सामील होत आहोत. काँग्रेसने सोईस्करपणे वाल्मिकी समाजाचा वापर केला पण विकास केला नाही अशी टीकाही श्री. टाक यांनी केली. वाल्मिकी समाजाच्या वतीने श्री. चव्हाण यांना समाजाच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन देत असल्याचेही ते म्हणाले. नागपूर नगरपालिका आणि महापालिका सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासंबंधीच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्याबद्दल महायुती सरकारचे ऋणी आहोत असेही श्री. टाक म्हणाले.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये उल्हासनगर येथील जयसिंग कच्छवाह, सुरजपाल चंडालिया, बाली मंदुपे, राजेंद्र अंडागेळे, राहुल टाक, भरत सोलंकी, शशंक बामेन, जगन्नाथ वड्डे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर