
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। हिरो मोटोकॉर्पनं आपल्या व्हिडा इलेक्ट्रिक सिरीजमध्ये नवं मॉडेल व्हिडा इव्हूटर व्हीएक्स२ गो 3.4 kWh सादर करत ईव्ही बाजारात मोठी एन्ट्री नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या स्कूटरचं अनावरण करण्यात आलं. व्हीएक्स 2 सिरीजमधील आधीच्या व्हीएक्स 2 Go 2.2 kWh आणि व्हीएक्स 2 Plus मॉडेल्सनंतर कंपनीचं हे सर्वात अपडेटेड आणि जास्त रेंज देणारं व्हेरिएंट आहे.
नवीन VX2 Go 3.4 kWh मॉडेलमध्ये दुहेरी रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली असून एका चार्जवर 100 किमीपर्यंतची रेंज मिळते. 6 kW पीक पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करणारी ही स्कूटर 70 किमी/तास टॉप स्पीड देते आणि शहर तसेच उपनगरी प्रवासासाठी आदर्श पर्याय ठरते. इको आणि राइड मोड्स, डिजिटल डिस्प्ले, कनेक्टिव्हिटी फीचर्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, OTA अपडेट्स आणि My VIDA अॅपसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आली आहेत.
या स्कूटरची किंमत 1,02,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं बॅटरी-एज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्यायही दिला असून तो 60,000 रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना बॅटरी खरेदी न करता सबस्क्रिप्शनवर वापरता येते आणि प्रति किलोमीटर 0.90 रुपये इतका खर्च येतो. त्यामुळे ईव्ही खरेदीची प्राथमिक किंमत मोठ्या प्रमाणात कमी होते.
हिरो मोटोकॉर्पनं सांगितलं की, VX2 Go 3.4 kWh मॉडेल दैनंदिन वापरासाठी जास्त रेंज आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स देण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे. कंपनीचं घर घर इवूटर अभियान ईव्हीचा प्रसार वाढवण्यावर भर देत असून सध्या देशभरात VIDA चे 4,600 हून अधिक चार्जिंग पॉइंट्स आणि 700 सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध आहेत.
सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिल्या जात असताना हिरो मोटोकॉर्पचं हे नवं मॉडेल ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणार असून ईव्ही बाजारातील स्पर्धेत कंपनीनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule