
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मा. मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त जनजागृती शिबीराचे आयोजन श्री. एस.एस. म्हेत्रे उर्दू हायस्कूल येथे करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व शाळेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेराजबानो शेख होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शमशोद्दीन नदाफ, विधीज्ञ शिवकैलास झुरळे, विधीज्ञ सरफराज शेख, आरिफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीरात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क, बालसंरक्षण कायदे, आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विधीज्ञ शिवकैलास झुरळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, मानवी सन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचे सामर्थ्य आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.” त्यांनी कायदेशीर मदतीसाठी १५१०० या हेल्पलाइन क्रमांकाची माहितीही दिली.विधीज्ञ सरफराज शेख यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम याविषयी विद्यार्थ्यांना सुलभ भाषेत माहिती दिली. गैरवर्तनाची ओळख, सुरक्षिततेचे उपाय आणि पालक व शिक्षकांशी संवादाचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड