
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्य सरकारने नेमलेल्या त्रिभाषा समितीची आज पुणे विभागाची बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांसह कलाकार, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सामान्य लोक, पालक असे वेगवेगळे घटक उपस्थित होते. समितीने सर्वांची मते जाणून घेतली. लिखित प्रश्नावली देऊन त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा हिंदी हवी की नको, असेल तर काय फायदे-तोटे होतील, असे प्रश्नावलीचे स्वरूप होते, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला. त्यानुसार शासन निर्णय काढत प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी हिंदी भाषा निवडली. त्याला विरोध झाल्याने राज्य सरकारने शासन निर्णय रद्द केला. त्यानंतर त्यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती नेमली. ही समिती वेगवेगळ्या विभागात, जिल्ह्यांमध्ये जाऊन विविध घटकांची मते जाणून घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड