
फलोदी, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : राजस्थानमध्ये एका बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुमारे 18 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जयपूरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या फलोदी जिल्ह्यात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी बीकानेरमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोलायत येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते जोधपूरजवळील सूरसागर या पर्यटन स्थळाकडे परत येत होते. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील संदेशात शर्मा म्हणाले की, फलोदी येथील मतोडा परिसरात झालेल्या रस्ते अपघातात अनेक नागरिकांचे झालेले निधन अत्यंत दुःखद आणि हृदयविदारक आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांबरोबर आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाला सर्व जखमींवर योग्य उपचार होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करत जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अपघाताबाबत पोलिस आयुक्त ओमप्रकाश पासवान म्हणाले की, “हा अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून त्यांना रुग्णालयात आणण्यात येत आहे. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी प्रयत्नरत असल्याचे पासवान यांनी सांगितले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी