
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : धुके आणि वाऱ्याची कमी गती यामुळे दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली असून हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहचली आहे. राजधानीत एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) 400 च्या पुढे गेल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) म्हंटले आहे.
राजधानी दिल्ली येथे आज, रविवारी सकाळी धुके आणि वाऱ्याचा अल्पवेग यामुळे शहरातील अनेक ठिकाणी एक्यूआय गंभीर पातळीवर गेला आहे. सीपीसीबीनुसार, सकाळी 7 वाजता दिल्लीचा एकूण एक्यूआय 377 इतका होता, जो शनिवारच्या 233 आणि शुक्रवारीच्या 218 च्या तुलनेत खूपच जास्त आहे. उत्तर दिल्लीतील वजीरपूर आणि दक्षिण दिल्लीतील आर.के.पुरम हे सर्वाधिक प्रदूषित भाग ठरले आहेत, जिथे अनुक्रमे 432 आणि 425 एक्यूआय नोंदवले गेले.
सीपीसीबीच्या ‘समीर’ अॅपच्या माहितीनुसार, बुराडी (412), बवाना (413), द्वारका सेक्टर-8 (407), जहांगीरपुरी (402), मुंडका (404), नेहरू नगर (403), पंजाबी बाग (403), पूसा (404), चांदनी चौक (414), रोहिणी (415), सिरी फोर्ट (403) आणि विवेक विहार (407) या परिसरांतील हवेची गुणवत्ता देखील ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचली आहे. केवळ तीन भाग — एनसीआयटी द्वारका (254), आयएचबीएएस, दिलशाद गार्डन (270) आणि दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (292) येथे हवा ‘खराब’ श्रेणीत नोंदली गेली आहे.
सीपीसीबीच्या निकषांनुसार, एक्यूआय 0-50 दरम्यान ‘चांगली’, 51-100 ‘समाधानकारक’, 101-200 ‘मध्यम’, 201-300 ‘खराब’, 301-400 ‘अत्यंत खराब’ आणि 401-500 ‘गंभीर’ मानली जाते.दिल्लीतील सफदरजंग येथील प्राथमिक हवामान केंद्रानुसार, शांत वाऱ्यांसह दृश्यता 900 मीटर इतकी नोंदली गेली, तर पालम येथे दक्षिण-दक्षिणपश्चिम दिशेच्या वाऱ्यांसह दृश्यता 1,300 मीटर इतकी होती. शनिवारी कमाल तापमान 30.5 अंश सेल्सियस नोंदले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा 3 अंशांनी कमी होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी