
पाटणा, २ ऑक्टोबर (हिं.स.)बिहारमधील मोकामा येथे जन सूरज पक्षाचे समर्थक दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर काही तासांतच जनता दल युनायटेड (जेडीयू) नेते आणि मोकामा येथील पक्षाचे उमेदवार अनंत सिंग यांना रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
जन सूरज पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांचे समर्थक आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते दुलारचंद यादव यांची गेल्या गुरुवारी हत्या करण्यात आली. दुलारचंद यादव यांच्या कुटुंबाने अनंत सिंग आणि त्यांच्या समर्थकांवर खुनाचा आरोप करत गुन्हा दाखल केला. त्याच प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा सिंग यांना त्यांच्या गावी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह अटक करण्यात आली. अटकेनंतर, तिन्ही आरोपींना चौकशीसाठी पाटणा येथे आणण्यात आले आणि आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दुलारचंद यादव यांच्या नातवाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये थेट अनंत सिंग, त्यांचे पुतणे आणि इतरांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.
पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, मोकामा येथे दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दगडफेक झाली, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंतर एक मृतदेह सापडला, जो दुलारचंद यादव यांचा असल्याचे मानले जात आहे. मोकामा येथे झालेल्या हिंसाचारानंतर, निवडणूक आयोगाने बारह एसडीओ चंदन कुमार आणि एसडीपीओ राकेश कुमार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बारह-२ एसडीपीओ अभिषेक सिंह यांनाही निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पाटणा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक विक्रम सिहाग यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे