
अमरावती, 2 नोव्हेंबर (हिं.स.)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तीव्र टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला. अमरावतीच्या विश्रामगृहात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद साधला.पुढे बोलताना ते म्हणाले की “शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असूनही सरकार हातावर हात धरून बसले आहे. परदेशातून 11 टक्के कापूस आयात केल्याने स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार नाही,” अशी टीका त्यांनी केली आणि तातडीने सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी केली.मतदार यादीतील घोटाळ्यांवर बोलताना देशमुख म्हणाले की, काल मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. “EVM आणि मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी आहेत. बाहेरच्या राज्यातील नावे याद्यांमध्ये असून, मुंबई मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी तब्बल 120 मतदारांची नोंद झाली आहे. शासकीय बंगले बोगस मतदारांसाठी वापरले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत देशमुख म्हणाले, “आयोग उत्तर देत नाही, उलट भाजपकडून प्रतिक्रिया येतात.” अमरावती जिल्ह्यात तब्बल 10 हजार बोगस मतदार असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीनंतर पराभव ओळखून सत्ताधाऱ्यांनी फक्त चार महिन्यांत 70 लाख नवे मतदार तयार केले. या घोटाळ्यांमुळेच हे सरकार सत्तेत आले आहे.” यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष हेमंत देशमुख,नाना बोंडे, सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी