
रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहराध्यक्षपदी अजय इंगूळकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ही घोषणा करत इंगूळकर यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली. पूर्वीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर हे पद काही दिवसांपासून रिक्त होते. आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराजा मंगल कार्यालयातील बँक हॉल येथे पक्षाच्या बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, नितीन पाटील, तसेच खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरत उपस्थित होते. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान खोपोली मंडळातील पदाधिकाऱ्यांनी अजय इंगूळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर कोळी यांनी त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा केली.
या प्रसंगी खोपोली निवडणूक यंत्रणा प्रमुख यशवंत साबळे, विधानसभा मतदारसंघ समन्वयक हेमंत नांदे, माजी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, रमेश रेटरेकर, महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी अत्रे, तसेच युवा नेते आणि नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार विक्रम साबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नियुक्तीबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले, “अजय इंगूळकर यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शहरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल. आगामी निवडणुकीत पक्ष निश्चितच विजयी ठरेल.” नवीन शहराध्यक्ष अजय इंगूळकर यांनी जिल्हाध्यक्षांचे आभार मानत सांगितले की, “खोपोलीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकजुटीने काम करू. नगर परिषद निवडणुकीत भगवा नक्की फडकवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके