
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर ४० व्या ज्युनिअर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या धावपटू भूषण शिंदे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना वीस वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये तिहेरी उडी स्पर्धेत १५.५३ मीटर लांब उडी घेत रौप्यपदककावर आपले नांव कोरले.
भूषण शिंदे हा माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक गौरी राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी, नाशिक येथे गिरीराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून नियमित सराव करतो. भूषणने याआधी चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिहेरी उडी याच प्रकारात ब्रॉन्झपदक जिंकले होते.
भूषणने आजपर्यंत राज्यस्तरावर १५ पदके जिंकले आहेत, तर पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. भूषणने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथमच मेडल मिळविले असून भूषण तिहेरी उडी (Triple jump) प्रकारात मेडल प्राप्त करणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला आहे.
भूषण सध्या के. जी. डी. एम. कॉलेजचा विद्यार्थी असून त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगीरी, राष्ट्रीय प्रशिक्षक बाळासाहेब शिरफ़ुले, ललित दौंड, प्रसाद राजोळे, क्रीडा शिक्षक युवराज शेलार यांनी अभिनंदन केले आहे. यापुढे भूषण अशीच कामगिरी करून सुवर्ण पदक मिळवेल असा विश्वास त्याच्या प्रशिक्षक गौरी राजोळे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV