
चंद्रपूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।
वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
वरोरा शहरातील चार मित्र रुपेश कुळसंघे, प्रणय भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे रविवारी दुपारच्या सुमारास सायकलने तुराना घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीच्या पात्रात उतरले. त्यातील एक जण नदी काठावर होता, तर उर्वरित तिघे नदीतील खोलगट भागात गेले आणि बुडू लागले. त्यातील एक जण कसाबसा नदीच्या काठापर्यंत पोहोचला. मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू करताच, जवळच जनावरे राखत असलेल्या एका गुराख्याने तातडीने धाव घेतली. उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोन मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने, रूपेश आणि प्रणय हे दोन मित्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने खोल पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
रात्री उशीर झाल्यामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव